नवी दिल्ली : जम्मूतल्या सुंजवाँ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यापाठीमागे जैश-ए-मोहम्मदाचा म्होरक्या मसूद अजहरचा हात असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी म्हटलं आहे. शिवाय, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


संरक्षण मंत्र्यांनी आज जम्मूतील सुंजवाँ कॅम्पची पाहाणी केली यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या हल्लावर प्रतिक्रिया दिली. सितारामन म्हणाल्या की, "घटनास्थळावर दहशतवाद्यांकडील सामान आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. या सर्व कागदपत्रातून या हल्ल्यापाठिमागे पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे. या हल्लासंदर्भातील सर्व पुरावे लवकरच सादर केले जातील."


दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची भेट घेऊन राज्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. तर सोमवारी संध्याकाळी घटनास्थळाची पाहाणी करुन, लष्कराच्या रुग्णालयात जाऊन हल्ल्यातील जखमी जवानांची विचारपूस केली. तर, शनिवारी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनीही सुंजवाँ कॅम्पचा दौरा केला होता.

जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी शनिवारी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं.

सुंजावाँ ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल तीन हजार जवान आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर 150 घरं रिकामी करण्यात आली. तब्बल 30 तास दहशतवाद्यांविरुद्ध चाललेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तसेच एका जवानाच्या वडिलांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.

या हल्ल्या पाठीमागे रउफ असगर असल्याचं समोर येत होतं. रउफ हा मौलाना जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा तो भाऊ आहे. दरम्यान, अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला पाच वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिली होती.

संबंधित बातम्या

जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, पाच जवान शहीद

सुंजवाँ कॅम्प हल्ला, दोन जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा