नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये हजारो झाडे लावणारी आणि त्या झाडांना जगवणाऱ्या 107 वर्षांच्या आजीबाई  सालूमरदा थिमक्का यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या अनवाणी पायांनी राष्ट्रपती भवनात आल्या. सालूमरदा  थिमक्का  यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला. या प्रसंगाने राष्ट्रपती देखील भावूक झाले. थिमक्का यांना कर्नाटकात 'वृक्षमाता' नावाने ओळखले जाते. आज पद्म पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात त्या अत्यंत साधेपणाने सहभागी झाल्या. त्यांना पुरस्कार प्रदान करतेवेळी टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. पद्म पुरस्काराने देशातील सर्वात श्रेष्ठ आणि योग्य प्रतिभाशाली व्यक्तींना सन्मानित करणे आनंददायी असते. परंतु आज जेंव्हा पर्यावरण सुरक्षेसाठी मोठे काम करणाऱ्या कर्नाटकच्या 107 वर्षीय आजी सालुमरदा थिमक्का यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला तेंव्हा माझे हृद्य भरून आले होते, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट  करत म्हटले आहे. महिलांची संकल्प शक्ती, दृढ निश्चय आणि एकाग्रतेचे  थिमक्का हे मोठे उदाहरण आहे, असे कोविंद यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 6 जणांचा सन्मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज 58 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सकाळी राष्ट्रपती भवन इथं हा सोहळा संपन्न झाला. 11 मार्च रोजी राष्ट्रपतींनी 1 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 45 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा सन्मान केला. यात डॉ. अशोकराव कुकडे,  अनिलकुमार नायकजी, दिन्यार आर. कॉन्ट्रॅक्टरजी, मनोज बाजपेयी, डॉ. सुदाम काटेजी, शब्बीर सय्यद यांना आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. अशोकराव कुकडे, अनिलकुमार नायकजी, दिन्यार आर. कॉन्ट्रॅक्टरजी, मनोज बाजपेयी , डॉ. सुदाम काटेजी, शब्बीर सय्यद यांना आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन केले आहे. पद्म पुरस्कारांसाठी एकूण 112 व्यक्तींची निवड करण्यात आली होती. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातून व्यापार व उद्योग-पायाभूत सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे समूह अध्यक्ष अनिलकुमार नाईक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. अशोक कुकडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुकडे यांनी लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटलची स्थापना केली व या माध्यमातून त्यांनी गरीब रूग्णांना रास्तदरात आरोग्य सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.  कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द अभिनेते मनोज वाजपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य आणि प्राणी कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सैय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिध्द अभिनेते दिनयार काँट्रॅक्टर यांनी कला व नाट्य क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रा. सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.