नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजेच महामंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय भाजप अध्यक्षांकडून नवी सोशल मीडिया टीम जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखपदी अमित मालवीय यांच्या जागेवर दीपक म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. अमित मालवीय यांच्याकडे भाजपच्या आयटी सेलची जबाबदारी 10 वर्ष होती. दीपक म्हस्के छत्तीसगड मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष असून छत्तीसगड भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे आमंत्रित सदस्य आहेत.
दीपक म्हस्के यांच्या टीममध्ये कोणाचा समावेश?
दीपक म्हस्के यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातून प्रीति गांधी, दिल्लीतून शिवानंद द्विवेदी, उत्तराखंडचे आलोक भट्ट आणि हरियाणाचे अरुण यादव सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून काम करतील.
अमित मालवीय काय म्हणाले?
अमित मालवीय यांना 2015 मध्ये भाजपच्या आयटी सेलचं प्रमुख करण्यात आलं होतं. ते म्हणाले की एका दशकात मला सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मला पूर्ण विश्वास आहे दीपक म्हस्के यांच्या नेतृत्त्वात भाजपचं डिजीटल कम्युनिकेशन नव्या उंचीवर पोहोचेल, ते पूर्ण विश्वास, रचनात्मकता आणि स्पष्टपणे भारताच्या जनचर्चेला आकार देणं सुरु ठेवतील, असं मालवीय म्हणाले.
अमित मालवीय म्हणाले, दीपक म्हस्के यांना शुभेच्छा द्यायचा आहेत, जे भाजप सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून माझी जागा घेतील. याशिवाय सह संयोजक बनललेल्या प्रीति गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांना देखील मालवीय यांनी शुभेच्छा दिल्या. दीपक म्हस्के हे छत्तीसगडमधील असून ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. पक्षाच्या संघटनात्मक आणि मीडिया संदर्भातील कामांमध्ये ते सक्रिय असायचे.
अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाजपच्या समर्थकांचे आभार मानले. हा परिवार चढ उताराच्या काळात सोबत राहिला. भारतातील लोकांच्या चर्चेला नवी दिशा देण्यात त्यांनी निर्णायक भूमिका पार पाडली. भाजप समर्थक ऊर्जास्त्रोत असल्याचं देखील अमित मालवीय यांनी म्हटलं. येत्या काळात भाजपच्या आयटी सेलच्या नव्या पदाधिकाऱ्यांना देखील समर्थन द्यावं, असं आवाहन मालवीय यांनी केलं.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रा. एम नागराज, प्रा. तारिक मन्सूर, डॉ. मधुचंद्र कर
राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री)
विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती ईरानी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी, संजय भाटिया यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलं आहे.
