पुणे : गेल्या काही वर्षांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुरु असलेली ढकलगाडी बंद होण्याची शक्यता आहे. सरसकट पास करण्याचा निर्णय पाचवीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं समोर ठेवला आहे.


2018 पासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. कुणालाही नापास न करण्याच्या पद्धतीनं शिक्षण पद्धतीवर आणि बालकांच्या बुद्धिमत्तेवर विपरित परिणाम होत असून, तो टाळण्यासाठीच आता नापास करण्याचे अधिकार शाळांना दिले जाणार आहेत.

पाचवी ते आठवी नापास करायचं की नाही, याचा निर्णय राज्य सरकारांना सोपवला जाणार आहे. त्यामुळे आठवीपर्यंत सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याच्या प्रकाराला चाप बसण्याची शक्यता आहे.

सीबीएसई दहावीच्या परीक्षाही पुन्हा सुरु?

सीबीएसईच्या दहावीच्या बोर्डाची परीक्षाही पुन्हा एकदा सुरु करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आज या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची पत्रकार परिषद होणार असून, या बाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.