भारताच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी (कोस्ट गार्ड) पाकिस्तानच्या नौदलाच्या जवानांना बुडताना वाचवलं.
गुजरातच्या ओखा किनाऱ्याजवळ रविवारी पाकिस्तानच्या नौदलाची एक सिक्युरिटी बोट समुद्रात पलटली. या बोटचं ठिकाण (लोकेशन) गुजरातच्या ओखा बंदरापासून 58 नॉटिकल मैल अंतरावर होतं. त्यामुळे पाकिस्तानने भारतीय तटरक्षक दलाकडून मदत मागितली.
मग भारताकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या. कोस्टगार्डकडून त्या भागातील 'आयसीजी अंकित' या जहाजाला तातडीने पाकिस्तानी बोट जिथे पलटली तिकडे पाठवण्यात आलं.
इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 एप्रिलला सकाळी कोस्टगार्डने 'सम्राट' आणि 'अरिंजय' ही आणखी दोन जहाजं मदतीसाठी पाठवली. याशिवाय एक विमानही दिमतीला होतं.
त्याचदिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय मच्छिमारांच्या एका बोटीने, समुद्रात बुडणाऱ्या पाकिस्तानी नौसेनेच्या दोन जवानांना वाचवलं. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत बिकट होती.
मग या मच्छिमारांनी दोन्ही जवानांना भारताच्या तटरक्षक दलाकडे सोपवलं. मग कोस्ट गार्डच्या जहाजावर असलेल्या डॉक्टरांनी बेशुद्ध असलेल्या पाकिस्तानी जवानांवर उपचार केले.
त्यानंतर भारताच्या कोस्टगार्ड्सनी समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या अन्य चार नौसैनिकांचे मृतदेहही शोधून बाहेर काढले.
मग कोस्ट गार्डने पाकच्या वाचवलेल्या दोन जवानांसह अन्य चार जवानांचे मृतदेह पाकिस्तानला सोपवले.
एकीकडे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भारताचा गुप्तहेर समजून फाशीची शिक्षा दिल्याने, भारतात संतापाची लाठ आहे. मात्र असं असतानाही भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवत, जगासमोर दिलदारपणाचं दर्शन घडवलं आहे.
कुलभूषण जाधवांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी 10 एप्रिलला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
भारताचे पाकिस्तानवर ताशेरे
कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.
कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत.
संबधित बातम्या