मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचं संकट दाट होत असताना आता आणि एका व्हायरसचा धोका जगासमोर आहे. याबाबत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) भारत सरकारला इशारा दिला आहे. चीनमधील आणखी एक कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) भारतासाठी मोठं संकट ठरू शकतं. आयसीएमआरच्या अहवालात असे म्हटलं आहे की, या व्हायरसमुळे माणसांमध्ये ताप, Febrile Illnesses, मेनिंजाइटिस (Meningitis) आणि मुलांमध्ये इन्सेफलाइटिस (Paediatric Encephalitis) च्या समस्या उद्भवू शकतात.


आयसीएमआरच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या सात संशोधकांच्या दाव्यानुसार, चीन आणि व्हिएतनाममध्ये कॅट क्यू व्हायरसचं अस्तित्व आढळलं आहे. हा व्हायरस क्युलेक्स डास आणि तेथील डुकरांमध्ये आढळला आहे. भारतातही क्युलेक्स डासांमध्ये कॅट क्यू व्हायरस सदृश आढळलं आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायररोलॉजीने म्हटले की, सीक्यूव्ही प्रामुख्याने डुकरांमध्ये आढळतो आणि चीनमध्ये पाळीव डुकरांमध्ये व्हायरस विरूद्ध अँटीबॉडीज असल्याचे आढळले आहे. याचा अर्थ असा की कॅट क्यू व्हायरसने चीनमध्ये स्थानिक स्तरावर त्याचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरवात केली.


883 नमुन्यांपैकी दोन पॉझिटिव्ह


शास्त्रज्ञांनी विविध राज्यात 883 लोकांचे नमुने घेतले आणि दोघांमध्ये व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी आढळल्या आहेत. या दोघांना एकाच वेळी या व्हायरसची लागण झाल्याचे तपासात समोर आलं आहे. जूनमध्ये इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, "माणसांच्या सीरम सॅम्पलच्या तपासात अँटी सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळणे आणि डासांमधील सीक्यूव्हीच्या आधारे हा आजार भारतात पसरला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हा व्हायरस आपल्यामध्ये आधीपासूनच अस्तित्त्वात आहे की नाही हे शोधण्यासाठी मानव आणि डुकरांच्या सीरमचे अधिक नमुने तपासले पाहिजेत. एका वैज्ञानिकांनी सांगितले की, 'भारताच्या संदर्भात आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की काही डास सीक्यूव्हीसाठी संवेदनशील आहेत. अशा प्रकारे, डासांमुळे सीक्यूव्ही संसर्ग होऊ शकतो.