नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी संसदेमध्ये मोदीवर जोरदार हल्ला चढवला होता. यातून चार्ज झालेल्या काँग्रेसने मोदी सरकारवर 2.5 लाख कोटीच्या डाळ घोटाळ्याचा आरोप करत, स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संमतीनेच हा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.


 

गौतम अदानींच्या 'अदानी विल्मर' या कंपनीने, गुजरातमधील ETG वर्ल्ड या कंपनीच्या पडद्यामागून डाळीचा काळाबाजर केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

 

ETG वर्ल्डने मोजांबिक या आफ्रिकी देशामधून 55 रुपये प्रतिकिलोने तूर डाळ खरेदी करून 75 किलोने डाळीची विक्री करत आहे. हा गोरखधंदा गेल्या 15 महिन्यांपासून सुरु असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

 

सध्या किरकोळ बाजारात तूर डाळ 200 रुपये प्रतिकिलोने डाळीची विक्री सुरु आहे. यामुळे जर नफा तोट्याचा विचार केल्यास देशात उत्पादित झालेली, किंवा परदेशातून आयात केलेली तूर डाळ 65 रुपये प्रतिकिलो दरानेच विक्री होणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

 

दरम्यान, भाजप प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, ''काँग्रेसचे प्रत्येक आरोप तथ्यहिन असून मोदी सरकारने साठेबाजारांवर कारवाई करत, एक लाख 32 हजार टन अवैध साठा केलेली डाळ बाजारात पुन्हा विक्रीसाठी आणली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच कमिशनखोरांचे राज्य असल्याने सर्वात जास्त डाळीची आयात केली गेली.''

 

शर्मा म्हणाले की, ''काँग्रेसने डाळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे निर्णय कधीही घेतले नाहीत. आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच हजार रुपयांचे एमएसपी निश्चित केली, आणि त्यावर ५० रुपयांचा बोनस देखील दिला. तेव्हा काँग्रेसने राजकारण करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करावे.''