Gujarat: भूकंप आणि चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीनंतर मुलांचं नाव ठेवण्याच्या विचित्र घटना आपण याआधी देखील ऐकल्या असतील. हाच ट्रेंड फॉलो करत गुजरातच्या एका महिलेने पश्चिम किनार्याजवळ आलेल्या चक्रीवादळानंतर तिच्या एक महिन्याच्या मुलीचं नाव 'बिपरजॉय' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेचं कुटुंब सध्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ येथे एका निवारागृहात आहे, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेल्या हजारो लोकांपैकी ते एक आहेत.
नवजात मुलीला 'बिपरजॉय' नाव
संपूर्ण जगाचं लक्ष असलेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) गुजरातच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे. लवकरच हे वादळ गुजरात किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे.मात्र, गुजरातमध्ये या वादळाच्या आगमनापुर्वीच 'बिपरजॉय'चा जम्न झाला आहे. बिपरजॉय वादळ (Biparjoy Cyclone) गुजरातमध्ये येण्याआधीच गुजरातच्या एका महिलेने मुलीला जन्म दिला आणि आपल्या मुलीचे नाव 'बिपरजॉय' ठेवायचे असा निर्णय या महिलेने घेतला.
चक्रीवादळामुळे स्थलांतरित केलेल्यांपैकी हे कुटुंब
बिपरजॉयची आई अशा हजारो लोकांपैकी एक आहे, ज्यांना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मूळ ठिकाणाहून हलवण्यात आले आहे. ज्या घरात एक महिन्यापूर्वी या मुलीचा जन्म झाला, ते घर देखील बिपरजॉय वादळामुळे ग्रस्त असून चक्रीवादळाच्या भीतीने त्यांना घर सोडावं लागलं आहे आणि सुरक्षितस्थळी स्थलांतर करावं लागलं आहे. सध्या या महिलेचे कुटुंब कच्छ जिल्ह्यातील जखाऊ येथील एका शेल्टर होममध्ये आहे. गुजरातजवळील कच्छमधील 70 हजारांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. वादळाच्या भीतीमुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
वादळाच्या नावावरून नामकरण करण्याचा ट्रेंड
यापुर्वी देखील अनेकांनी आपल्या मुलांना भूकंपाची आणि चक्रीवादळाची नावं दिली आहेत. चक्रीवादळाच्या नावावरून मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा अशा बातम्या समोर आल्या आहेत. याआधी तितली, फणी आणि गुलाब या चक्रीवादळांवरून नुकत्याच जन्मलेल्या मुलांची नावं ठेवण्यात आली आहेत. काहींनी तर कोरोना महामारीनंतर आपल्या मुलांची नावं कोरोना देखील ठेवली होती.
कोरोना महामारीवरूनही ठेवली होती नावं
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये कोविड-19 महामारी वाढीच्या काळात, एका नवजात बाळाचं नाव प्राणघातक विषाणूच्या नावावरून कोरोना ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशातील कडपा जिल्ह्यातील दोन विविध कुटुंबातील लोकांनी देखील आणखी दोन मुलांची नावं कोरोना ठेवली होती, त्यांच्या पालकांनी कोविड साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याने जग एकत्र आणले, म्हणून असं नाव ठेवल्याचं सांगितलं.
हेही वाचा:
Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळ किती भयंकर? समोर आली सॅटेलाइट दृश्यं; पाहा...