मुंबई: टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरुन हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पलटवार केला आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई मेल करुन, आपली बाजू मांडल्याचं सांगण्यात येतंय.


या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसंच आपल्याला कधीच कामाचं स्वातंत्र्य मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मिस्त्रींनी गोपनीय मेलमध्ये काय म्हटलंय?

"अचानक चेअरमनपदावरुन हटवल्यामुळे मला धक्का बसला आहे. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे. हा निर्णय अवैध आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. चेअरमनपदी राहूनही मला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं नाही.  त्यामुळे चेअरमनपद कमकुवत झालं होतं. ज्याबाबत मला माहिती नव्हती, त्या कंत्राटांना मंजुरी देण्याचा अट्टाहास माझ्याकडे करण्यात आला. ", असं मिस्त्रींनी म्हटलं आहे.

 मला हटवल्याने टाटा ट्रस्टचं कौतुक होत नाही, तर टाटा आणि माझी स्वत:ची प्रतिमा मलिन झाली आहे, असंही मिस्त्रींनी म्हटलं आहे. 2012 मध्ये मला कार्यकारी संचालकपदावरुन चेअरमन बनवलं, तेव्हा किती गंभीर समस्या वारसा हक्काने मिळणार आहेत याचा अंदाज नव्हता, असं मिस्त्रींनी नमूद केलं आहे.

युरोपात टाटा स्टीलचा प्लांट विकण्याच्या सायरस यांच्या निर्णयाला टाटा परिवाराचा विरोध होता. टाटा परिवाराला कंपनीच्या जागतिक विस्ताराची अपेक्षा होती.

सायरस मिस्त्रींना 'टाटा'

सायरस मिस्त्री यांना सोमवारी टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आलं. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.

सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती.

संबंधित बातम्या: 

सायरस मिस्त्रींना ‘टाटा’, चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !

'मला बाजू मांडू दिली नाही', सायरस मिस्त्रींचं टाटा संचालक मंडळाला पत्र