नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्या ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी भुवनेश्वर येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर हवाई सर्वेक्षण करतील आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील.


शाच्या पूर्वेकडील भागात बुधवारी 'यास' चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. चक्रीवादळाच्या वेळी तेथे ताशी 145 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या वेगवान वाऱ्यांमुळे तेथे अनेक घरांचे नुकसान झाले, शेतांमध्ये पाणी भरलं. यास चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये मोठं नुकसान झालं आहे.  या तीन राज्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.


ओडिशाच्या बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात 128 गावांमध्ये पाणी भरलं होतं. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या गावांना सात दिवस मदत पोहोचवण्याची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी हवाई सर्वेक्षण केले. या चक्रीवादळामुळे कमीतकमी एक कोटी लोक प्रभावित झाले आहेत, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. 


'तोक्ते' चक्रीवादळानंतर एका आठवड्यात देशाच्या किनाऱ्यावर येणारं यास दुसरं चक्रीवादळ होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच गुजरात दौर्‍यावर होते. तेथे त्यांनी तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता आणि गुजरातसाठी एक हजार कोटींची मदतीची घोषणाही केली होती.