Cyclone Mocha Update : चक्रीवादळ मोका (Cyclone Mocha) या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये धडकण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. हवामान खात्याने सांगितलं की, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे आज (8 मे) या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची दिशा आणि भूभागावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. मात्र, मोका चक्रीवादळ कुठे धडकणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
1. बंगालमध्ये तूर्तास धोका नाही
हवामान निरीक्षण संस्थेने म्हटलं आहे की उत्तर बंगालचे जिल्हे चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता नाही, कारण चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यास पुढील आठवड्याच्या अखेरीस बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीवरील दक्षिण बंगालवर परिणाम होऊ शकतो.
2. बंगालमध्ये आज पाऊस
पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आज (8 मे) हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, हुगळी, बांकुरा, बीरभूम, पूर्वा मेदिनीपूर, हावडा, पूर्वा आणि पश्चिम वर्धमान शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
3. या जिल्ह्यांमध्ये पाऊस
याशिवाय दार्जिलिंग, जलपाईगुडी, कलिमपोंग, अलीपुरद्वार, कूचबिहार, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि मालदा येथे येत्या 24 तासांत हलका पाऊस पडू शकतो.
4. पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
वादळाच्या वेळी वीज खंडित झाल्यास कोलकातामधील सर्व पोलीस ठाण्यांना जनरेटर तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयात असलेल्या कमांड सेंटरमध्ये असलेला कंट्रोल रुम रविवारपासून कार्यरत आहे.
5. आंध्र प्रदेशात पावसाचा इशारा
आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनारी भागात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार राज्यात तीन दिवस पाऊस पडेल. काही ठिकाणी वीजही पडू शकते.
6. ओदिशातील 18 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
IMD च्या इशाऱ्यामुळे देशभरातील अनेक राज्ये हाय अलर्टवर आहेत. ओडिशातील 18 जिल्ह्यांमध्ये 'मोका' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह 9 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7. मोका अंदमानच्या दिशेने जाऊ शकतो
हवामान तज्ज्ञांच्या मते, वादळ दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 8 ते 11 मे दरम्यान अंदमानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
8. वादळाची दिशा शोधणं कठीण
भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान केंद्रे वादळाची दिशा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत नाही तोपर्यंत वादळाचा मार्ग सांगणं कठीण असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
9. मोका म्यानमारमध्ये धडकू शकतं
शास्त्रज्ञांच्या मते, मोका चक्रीवादळाचा म्यानमारवर परिणाम होऊ शकतो. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्णपणे उलट दिशेने जाऊ शकतं.
10. 50 किमी वेगाने वारे वाहतील
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात 40-50 किमी ते 60 किमी प्रति तास वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे.