Mandous Cyclone: मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे दोन वाजता चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकलं. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे 115 मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. ते म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचं लक्ष आहे. नुकसानाचे मुल्यमापन केले जात आहे. मदतकार्य वेगानं सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय. 89 जनावरांचा मृत्यू झालाय. तर यामुळे 151 घरांचं नुकसान झालेय.
मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले की, 'कासीमेडू येथे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या तयारीमुळे मोठी हानी झाली नाही. उन्नत योजनामुळे कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन करता येते, हे आम्ही सिद्ध केले आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातून 200 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 9000 जणांना अन्न पुरवलेय. त्याशिवाय चक्रीवादळामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी 15 हजार झाडांची छाटनी करण्यात आली आहे.
सध्याची स्थिती काय?
मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती दलाची तैयार करण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने सर्व पार्क आणि खेळाची मैदानं बंद करण्याचा आदेश दिलाय. प्रभावित भागात एनडीआरफ दल तैणात करण्यात आले आहे. त्याशिवाय तामिळनाडू सरकारने पाच हजार पेक्षा जास्त मदत केंद्रे सुरु केली आहेत.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी -
मंदोस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या 17 जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. IMD दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळं कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. 11 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक -
आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. अनेक भागात पूराची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलवली आहे. यामध्ये चक्रीवादळाच्या स्थितीची आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. एसपीएसआर नेल्लोर, तिरुपती, चित्तूर आणि अन्नामय्या या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.