भुवनेश्वर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आज संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकणार आहे. हे चक्रीवादळ 95 किमी तासी वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील किनारपट्टी क्षेत्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला शनिवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले असून रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचे 'गुलाब' नाव हे पाकिस्तानने सुचवलं आहे. विशाखापट्टनम आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टनम या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. 


भारतीय हवामान खात्याने या संबंधी रेड अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचं तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.


बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मच्छिमारांना आज न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तौक्ते आणि यास या चक्रीवादळानंतर या वर्षी निर्माण होणारं गुलाब हे तिसरं चक्रीवादळ आहे. 


गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबरपर्यंत बंगाल, ओडिशा, मध्य आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी लहान-लहान चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचसोबत विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा कोकण, मुंबई आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या ;