Biparjoy Cyclone in Rajasthan : बिपरजॉय चक्रीवादळाचं (Cyclone Biporjoy) संकट अद्याप संपलेलं नाही. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये (Gujrat) विध्वंस केल्यानंतर आता राजस्थानमध्ये (Rajasthan) पुढे सरकलं आहे. चक्रीवादळ आज, 17 जून रोजी सकाळी राजस्थानमध्ये पोहोचलं आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पण धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा वाळवंटात कहर सुरु आहे.


बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट अद्याप कायम


चक्रीवादळामुळे बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नऊ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान केलं आहे. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या निशाण्यावर आता राजस्थान आहे. राजस्थानमधील प्रशासन सध्या अलर्टवर आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच शमणार आहे. यासोबत चक्रीवादळाचा परिणाम देशभरात होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे पाऊसही लांबला आहे.






भारतीय हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर


भारतीय हवामान विभागाने (IMD - India Meteorological Department) ट्विट करत चक्रीवादळाबाबत ताजी माहिती दिली आहे. त्यानुसार, 'आज, 17 जून रोजी 8.30 वाजता चक्रीवादळ बिपरजॉयचा बाडमेरपासून 80 किमी दक्षिणेस आणि जोधपूरपासून 210 किमी नैऋत्येस गुजरात आणि आग्नेय पाकिस्तानला लागून असलेल्या नैऋत्य राजस्थान येथे पोहोचलं आहे. पुढील सहा तासांमध्ये चक्रीवादळ कमकुवत होण्याचा अंदाज आहे.'


आता राजस्थानमध्ये पोहोचलं बिपरजॉय चक्रीवादळ 


बिपरजॉय चक्रीवादळ आता राजस्थानमध्ये पोहोचलं आहे. सॅटेलाईट फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 36 तासांत हे चक्रीवादळ हळूहळू शमण्याची शक्यता आहे. मात्र यासह परिसरात जोरदार वारे वाहत असून विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरु आहे. चक्रीवादळामुळे येत्या 12 तासांत राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.



अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 4 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ 15 जून रोजी भारताच्या किनारपट्टीवर आदळलं. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ किनारपट्टीवर आदळेल्या या चक्रीवादामुळे मोठं नुकसान झालं आहे.