लखनौ : एका वर्षात कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणारी व्यक्ती बेरोजगार असू शकते का? हा काय भलताच प्रश्न असं तुम्हाला वाटेल. पण शिक्षणाच्या बाजारात मेरिटची काय किंमत केली जाते याची एक संतापजनक कहाणी युपीत समोर आलीय. या शिक्षण घोटाळ्यामुळे सध्या राजकीय वातावरणही जोरदार तापलंय.
अनामिका शुक्ला असं या महिलेचं नाव असून 25 शाळांमध्ये तिची शिक्षिका म्हणून नोंद आहे. गेल्या 13 महिन्यांत 1 कोटी रुपये पगार सरकारी खात्यातून काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातल्या शिक्षण खात्यातला हा घोटाळा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकाच नावानं इतक्या शाळांमध्ये नोकरी करणारी ही महिला नेमकी कोण आहे, कशासाठी तिनं हा प्रकार केला, की तिच्या नावावर नोकरी बळकावणारे दुसरेच कुणी आहेत असे प्रश्न उपस्थित होत होते. अचानक काल या सगळ्या घटनेला नाट्यमय वळण मिळालं जेव्हा खरी अनामिका शुक्ला समोर आली.
एखाद्या चित्रपटात शोभेल असं कथानक या युपीतल्या शिक्षण घोटाळ्याचं आहे. कारण ज्या अनामिका शुक्ला या नावाचा वापर करुन हा सगळा घोटाळा झाला. ती अनामिका शुक्ला स्वत: मात्र बेरोजगार आहे. म्हणजे तिच्या नावाचा, तिच्या मार्कलिस्टचा गैरवापर करणारे मालामाल झाले. आणि ती मात्र नोकरीसाठी वंचितच राहिली. शिकूनही नोकरी मिळत नाही म्हणून घरच्यांचे, नातेवाईकांचे टोमणे ऐकत राहिली.
मजुरांची नोंदणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; मनसेच्या मागणीला यश
2017 मध्ये उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर, लखनौ, बस्ती, मिर्झापूर, जौनपूर या पाच जिल्ह्यांमध्ये अनामिकानं नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी तिनं आपली कागदपत्रं संबंधित ठिकाणी जमाही केली. पण मुलाखतीला ती हजर राहू शकली नाही. तिच्या या कागदपत्रांचा पुढे घोटाळेबाज कसा वापर करणार आहेत याची तेव्हा तिला सुतरामही कल्पना नसेल.
खरा मेरिट बेरोजगार, नकली मात्र मालामाल
- अनाामिकाचं शैक्षणिक रेकॉर्ड
- दहावी- 80.16 टक्के
- बारावी- 78.6 टक्के
- बीएड - 76. 5 टक्के
- टीईटी प्रवेश परीक्षा- 60 टक्के
माध्यमांमध्ये अनामिका शुक्लाच्या नावानं हा सगळा घोटाळा झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तेव्हा आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनं स्थानिक प्रशासनासमोर तक्रार दाखल केली. या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापलंय. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांनी यूपी सरकारनं अनामिकाची माफी मागावी असा हल्लाबोल केलाय.
अनामिकाच्या नावावर ज्या बोगस व्यक्ती पगार घेत होत्या, त्यापैकी एका महिलेला पोलिसांनी अटक केलीय. पण या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती पाहता खरे सूत्रधार कुणीतरी दुसरंच असण्याची शक्यता आहे. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या आणि मेरीटवाल्यांचा हक्क हिरावत भलत्यांचीच वशिलेबाजी करणाऱ्या या दलालांना शिक्षा मिळाली तरच अनामिकाला न्याय मिळेल.
Amitabh Bachchan | बिग बींचा मदतीचा हात; मुंबईत अडकलेल्या यूपीतील लोकांसाठी 6 विमानांची सोय