मुंबई : नोकरदार वर्गाला पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिलअखेर पर्यंतच काढता येणार आहे. एक मे नंतर कर्मचाऱ्यांना वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यानंतरच पीएफची संपूर्ण रक्कम काढता येणे शक्य होणार आहे.
पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यापैकी संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा निर्णय कायम राखण्यात आला आहे. तो 1 मे पासून लागू करण्यात येईल.
आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे. आता मात्र अशा कर्मचाऱ्यांना 'पीएफ'मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम मिळू शकेल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नाही. हा नवीन नियमही 1 मे पासून लागू होणार आहे.
महिलांना सवलत
कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत विशेष सवलत दिली आहे. यानुसार जर कोणत्याही महिलेने लग्न, गरोदरपण तसंच बाळाच्या जन्मासारख्या कारणांसाठी नोकरी सोडली असेल, तर दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही संपूर्ण रक्कम मिळू शकेल.