नवी दिल्ली : सौदी अरेबियातील अराम्कोच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ल्याचा फटका जगभरातील देशांसह भारताला बसण्याची शक्यता आहे. भारतात येत्या काळात इंधन दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
अराम्कोच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 60 डॉलरवरुन प्रति बॅरल 72 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ही दरवाढ प्रति बॅरल 100 डॉलर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सोमवारी एका दिवसातच कच्च्या तेलांच्या किमतीत बॅरलमागे 11 टक्क्यांची वाढ झाली.
कच्चा तेलाच्या वाढीचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होतो. आज मुंबईत पेट्रोलच्या किमतीत 12 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांनी वाढ झाली आहे. येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 5 ते 10 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमती वाढ झाल्यास त्याचा परिणाम इतर जीवनावश्य वस्तूंवरही होतो.
कच्च्या तेलााची टंचाई लक्षात घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राखीव इंधन वापरण्यास परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. "सौदी अरेबियातील इंधन शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ल्यानंतर तेलाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजारातील इंधनाचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी राखील तेल वापरण्याची परवानगी देण्यात आलीआहे", असं ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.