प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये इंडिया आघाडीची जाहीर सभेत जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावाने स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना जवळून पाहण्यासाठी गर्दी केली. दोन्ही नेते येताच कार्यकर्ते अनियंत्रित झाले आणि नेत्यांच्या स्टेजवर पोहोचले. हा गोंधळ इतका प्रचंड होता की राहुल गांधी आणि अखिलेश यादव कोणतेही भाषण न करता व्यासपीठावर 10 ते 12 मिनिटे चर्चा करून निघून गेले. फुलपूर लोकसभा मतदारसंघात राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती. याठिकाणी अभूतपूर्व गर्दी झाली. 






फुलपूर लोकसभा मतदारसंघात संयुक्त निवडणूक प्रचारासाठी आलेले राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या बैठकीत रविवारी अभूतपूर्व गर्दी झाली. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षेसाठी बांधलेले बॅरिकेड तोडून स्टेजवर कसे पोहोचले हे पाहायला मिळते. एकीकडे मंचावर नेत्यांची भाषणे सुरू होती, तर दुसरीकडे खाली गोंधळ सुरू होता. गदारोळामुळे राहुल आणि अखिलेश यांनी थोडक्यात भाषण संपवून ते निघून गेले. 






फुलपूर येथे इंडिया आघाडीतर्फे संयुक्त रॅली काढण्यात आली. राहुल गांधी पहिले येऊन मंचावर बसले. काही वेळाने अखिलेश यादव मंचावर आले आणि त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांना स्टेजवर चढायचे होते. त्यांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्सही तोडले. हातात सपा आणि काँग्रेसचे झेंडे फडकावत या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.






राहुल आणि अखिलेश यांनी भाजपवर हल्लाबोल केला


या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस नेते आणि कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येत नाही. नंतर प्रकरण शांत झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी काही वेळ भाषण केल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांनीही जाहीर सभेला संबोधित केले. अखिलेश यादव म्हणाले की, भाजप आमच्या, तुमच्या आणि संविधानाच्या मागे लागली आहे. संविधान वाचले तर नोकऱ्या उपलब्ध होतील. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असे ते म्हणाले. त्याचवेळी राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवले, पण आम्ही देशातील करोडो लोकांना करोडपती बनवू. करोडो गरिबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल. त्यानंतर करोडो महिलांच्या खात्यावर दरमहा 8500 रुपये पाठवले जातील.


इतर महत्वाच्या बातम्या