Crime News : ओडिशात भ्रष्टाचाराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. ओडिशाच्या दक्षता विभागाने छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाहून एका वरिष्ठ अभियंत्यानं घाबरून खिडकीतून नोटांचे बंडलं खाली फेकले. या अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्याच्या दोन निवासस्थानांमध्ये तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आढळली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड असल्यामुळे, ती मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची यंत्रे आणावी लागली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ओडिशाच्या दक्षता विभागाने शुक्रवारी भुवनेश्वर आणि अंगुल येथे छापे टाकले. या कारवाईदरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून 2.1 कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली. भुवनेश्वर रोडवेज विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झॉटिका इमारतीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये 1 कोटी रुपये सापडले, तर अंगुलमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये 1.1 कोटी रुपये आढळून आले.

खिडकीतून नोटांचा पाऊस अन्...

दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच, बैकुंठनाथ सारंगी यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून 500 रुपयांच्या नोटांची बंडलं खाली फेकली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खिडकीतून फेकलेल्या या नोटा दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. उत्पन्नाच्या तुलनेत अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी सारंगी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी ओडिशा दक्षता विभागाचे 8 उपअधीक्षक (डीएसपी), 12 निरीक्षक, 6 सहाय्यक निरीक्षक (एएसआय) आणि इतर कर्मचारी सहभागी होते. भुवनेश्वर, अंगुल आणि पीपली येथील सारंगी यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. अंगुलच्या विशेष दक्षता न्यायाधीशांनी सर्च वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन केले जाणार 

विशेष म्हणजे, बैकुंठनाथ सारंगी केवळ दोन दिवसांनंतर सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या कार्यालयातही सध्या शोधमोहीम सुरू आहे. ही कारवाई केवळ प्रारंभिक टप्प्यात असून छापेमारी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सारंगी यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याच आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

'या' ठिकाणांवर एकाचवेळी धाड

दक्षता विभागाने बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरोधात छापेमारी करताना अंगुलमधील करदागडिया परिसरातील दुमजली घर, भुवनेश्वरच्या डुमडुमा भागातील पीडीएन एक्झॉटिका इमारतीतील फ्लॅट नंबर C-102, पुरी जिल्ह्यातील पीपली येथील सिऊलामधील फ्लॅट, अंगुलमधील शिक्षकपडा परिसरातील नातेवाईकांचे घर, लोकेपासी गावातील वडिलोपार्जित घर, मटियासाहीमधील दुमजली वडिलोपार्जित इमारत आणि भुवनेश्वरमधील आरडी प्लानिंग अँड रोड विभागातील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय अशा एकूण सात ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकली. 

आणखी वाचा 

5 नाही, ते साडे दहा किलो सोनं; पोलिसांची भेट घेताच एन्काऊंटर प्रकरणावर मंत्री शिरसाट यांचा खळबळजनक दावा