नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने कोटीचा आकडा पार केलाय. शनिवारी यात नव्या 25,152 रुग्णांची भर पडलीय. यातून बरं झालेल्यांची संख्या आता 95.50 लाख इतकी झाली आहे. यावर आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. अनियोजित लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केलाय.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, "कोरोना संक्रमणाचे रुग्ण आता एक कोटीच्या वर गेलेत. त्यात जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अनियोजित लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोना विरोधातली ही लढाई 21 दिवसात जिंकता येते असं पंतप्रधानांनी देशाला सांगितलं होतं. परंतु यामुळं देशातील कोट्यवधी लोकांच जीवन उद्ध्वस्त झालं."
भारतातली रुग्ण संख्या कोटीच्या वर
शनिवारी देशात कोरोनाच्या नव्या 25,152 रुग्णांची भर पडली. त्यामुळं देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी पेक्षा जास्त झाली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताचा अमेरिकेनंतर जगात दुसरा क्रमांक लागतो. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्याही 95.50 लाख इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 347 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 1,45,136 इतकी झाली आहे.
देशात 16 कोटी कोरोना चाचण्या
ICMR च्या अहवालानुसार 18 डिसेंबर पर्यंत देशात कोरोनाच्या 16 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 11 लाख चाचण्या करण्यात आल्या. देशातील कोरोना पॉझिटिव्ह दर हा सात टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी द्या, बैठकीत नेत्यांची मागणी
- सोनिया गांधींनी बोलवली असंतुष्ट कॉंग्रेस नेत्यांची बैठक, पक्ष बळकट करण्यावर देणार भर
- संसदीय समितीच्या बैठकीत विना अडथळा बोलू द्यावं, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
- LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ, राहुल गांधी म्हणाले-किती लाचार करणार देशाला!