नवी दिल्ली: देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून त्यामध्ये 60 वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजार असणारे 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. देशात आतापर्यंत 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे.


आतापर्यंत नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात ही राज्ये आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील 100 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सुरुवातीला कोरोनाची लस घेण्यासाठी लोक घाबरत असल्याचं दिसून आलं होतं. कोरोनाच्या लसीबद्दल पसरणाऱ्या अफवांमुळे लोक असं करत होते. पण गेल्या काही दिवसात कोरोनाच्या लसीबद्दल जागरुकता निर्माण झाल्याचं पहायला मिळालंय. ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीलगड या सोबत नऊ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या 75 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली आहे.


मुंबईतल्या खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस, 29 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी


देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय.


कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.


लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.


Corona Vaccination: पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाख जणांची लसीकरणासाठी नोंदणी