नवी दिल्ली: कोरोनाचे संक्रमण आणि लसीकरण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारत आणि शेजारील देशांच्या प्रमुखांची एक व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या 22 फेब्रुवारीला ही बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये पाकिस्तानलाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.


भारताच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली असून गेल्या वर्षीही अशा प्रकारची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या-त्या देशांचे प्रमुख आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. या बैठकीत कोरोनाचे संक्रमण आणि लसीकरण्याच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात येणार आहे.


या सर्व देशांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, तसेच सामान्य लोकांसाठी कोरोनाची लस कशा पद्धतीने उपलब्ध करुन द्यायची हे मुद्दे चर्चेच्या अजेंड्यावर असतील. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत अशाच प्रकारची चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्या बैठकीत उपस्थित नव्हते. त्यांच्या वतीने एका अधिकाऱ्याने या चर्चत भाग घेतला होता.


शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी होत असलेल्या जबरदस्ती विरोधात आझाद मैदानात राज्यभरातील पालकांचे आंदोलन


भारताकडून अनेक देशांना कोरोनाची लस पोहचवण्यात येत आहे. त्यातल्या त्यात दक्षिण आशियायी देशांना मोठ्या प्रमाणावर लस देण्यात येत आहे. या वेळी अफगानिस्तानला 75 हजार मेट्रिक टन खाद्यपदार्थ पोहचवण्यात येणार आहेत. सोबत काही औषधेही पाठवण्यात येणार आहेत. 'मिशन सागर' च्या माध्यमातून मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, सेशेल्स या देशांना औषधे आणि कोरोनाच्या लसी देण्यात येणार आहेत.


बांग्लादेशला 20 लाख, म्यानमार ला 17 लाख, नेपाळला 10 लाख, भूटानला1.5 लाख, मालदीव आणि मॉरिशसला प्रत्येकी एक एक लाख कोरोनाच्या लसी, सेशेल्सला 50 हजार आणि श्रीलंका व अफगानिस्तानला प्रत्येकी पाच लाख कोरोनाच्या लसी मदतीच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत.


मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार