नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्या लाटेनंतर मंत्री मंत्रीमंडळाची ही पहिली बैठक आहे. यावेळी, सद्यस्थिती बिकट असून यामुळे जगावर एक मोठे संकट उभे राहिले असल्याचे मंत्रीमंडळाने मान्य केलंय.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारची सर्व शस्त्रे एकजूट होऊन वेगवान काम करीत आहेत, जेणेकरून परिस्थितीला सामोरे जाता येईल. त्यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या भागातील लोकांशी सतत संपर्कात रहा, मदत करा आणि मग त्यांचा अभिप्राय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
स्थानिक पातळीवर समस्या ओळखून त्यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. याबरोबरच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांतील देशातील जनतेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
स्थानिक लोकांच्या संपर्कात रहा : पंतप्रधान
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारांना रुग्णालयात बेड वाढवण्या संदर्भात सांगण्यात आले आहे. पीएसए ऑक्सिजनची सुविधा आणि उत्पादन व वाहतुकीतून आवश्यक औषधांची उपलब्धता याबद्दल केंद्राच्या मदतीबद्दल माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त, त्याचा पुरवठा आणि उपलब्धता वाढविण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हेदेखील या बैठकीत अधोरेखित केले गेले.