नवी दिल्ली : भिलवाडा कुठे आहे असं विचारलं तर अनेकांना पटकन सांगताही येणार नाही. हे काही मुंबई, दिल्ली कोलकात्यासारखं मेट्रो शहर नाही की कुठलं हिल स्टेशन नाही. ना हे अगदी हॉट टुरिस्ट स्पॉट आहे. पण सध्याच्या कोरोना संकटात या भिलवाडाची चर्चा प्रशासकीय पातळीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु आहे. काय आहे हे भिलवाडा मॉडेल? कोरोनाशी लढताना त्यांनी अशा काय उपाययोजना केल्या, ज्यामुळे केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी सर्व राज्यांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितलं आहे..


कोरोनाच्या या संकटात भल्या भल्या महासत्ताही हतबल आहेत. काय करावं हे त्यांनाही कळत नाही. पण अशावेळी देशपातळीवर तरी त्याचं उत्तर दिलं आहे भिलवाडाने. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनीही या मॉडेलचं कौतुक करुन राज्यांना याच धर्तीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.


विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या देशात राजस्थानात अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका या राज्यालाही होताच. भिलवाडामध्ये 17 मार्चच्या सुमारास एका स्थानिक डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. पण या डॉक्टरची कुठलीही ट्रॅव्हल हिस्टरी नव्हती. त्यामुळे नेमका कुठून संसर्ग झाला आहे या कोड्यात प्रशासन पडलं होतं. भिलवाड्यातले हे प्रतिथयश डॉक्टर. त्यांच्या संपर्कात येणारे रोज हजारो लोक, त्यात इतर डॉक्टर, नर्सेसचाही समावेश. त्यामुळे संसर्गाचा स्त्रोत कळायच्या आत दुसर्‍याच दिवशी भिलवाडामधली संख्या थेट 14 वर पोहोचली. 24 तासांत संख्या एकावरुन 14 वर जाणं याचा अर्थ वैद्यकीय भाषेत भिलवाडा कम्युनिटी स्टेजच्या जवळ पोहोचलं होतं. पहिल्या दुसऱ्या स्टेजऐवजी थेट तिसऱ्याच स्टेजचं आव्हान प्रशासनाच्या अंगावर येऊन पडलं. पण त्यांनी तातडीनं कंबर कसून हे आव्हान पेललं.


नेमकं काय केलं भिलवाडाने?


- राजस्थानात जेव्हा राज्यभर लॉकऊन झालं नव्हतं, त्याच्या काही दिवस आधीच भिलवाडा जिल्हा सर्वप्रथम पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला.


- दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम केलं. जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल 22 लाख लोकांची डोअर टू डोअर तपासणी केली


- ही तपासणी एकदा नाही तर काही दिवसांच्या अंतराने आतापर्यंत तीन वेळा केली आहे.


- एका जिल्ह्यात जवळपास 2000 हजार लोकांची टीम केवळ टेस्टिंगसाठी निर्धारित करण्यात आली


- ज्या 16 हजार लोकांना सर्दी, ताप खोकल्याची लक्षणं सापडली, त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात होतं.


- पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चालू तरी होती, एका आठवड्यानंतर तीही बंद करुन सरकारने या सगळ्या
वस्तू लोकांना घरपोच करण्याची व्यवस्था केली..


अर्थात या सगळ्याचा परिणाम दिसू लागला. जे भिलवाडा राजस्थानातलं हॉटस्पॉट मानलं जात होतं, तिथे कोरोना निष्प्रभ ठरु लागला. जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट, एसपी हरेंद्र कुमार हे या मॉडेलपाठीमागचे चेहरे. त्यांना राज्याच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली साथ, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्णय स्वातंत्र्य या गोष्टीही यात मोलाच्या ठरल्या.


काही दिवसांपूर्वी भिलवाडा कोरोनाच्या राष्ट्रीय यादीत झळकत होतं. एकाच वेळी 27 रुग्ण सापडले होते. पण अवघ्या काही दिवसांत इथली परिस्थिती बदलली. 2 एप्रिलपासून इथे कोरोनाचा नवा रुग्णही सापडलेला नाही.


भिलवाडा हे राजस्थानचं टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखलं जातं. विदेशी पर्यटकांच्या जाण्यायेण्यानं ते कोरोनाच्या गर्तेत सापडलं. देशात सुरुवातीच्या टप्प्यात जे हॉटस्पॉट होते, त्यात मोठा आऊटब्रेक भिलवाड्यात झाला. पण आता भिलवाडा त्यावर मात करतंय. राजस्थानात कोरोनाबाधितांची संख्या आजमितीला 348 इतकी आहे. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पण भिलवाड्याने लावलेला ब्रेक मोठा आहे. कठोर आणि नेमके उपाय करतानाच लोकांना त्रास होऊ नये म्हणून कामात दाखवलेली संवदेनशीलता हा भिलवाडा मॉडेलचा सार आहे. देशातली इतर राज्येही असेच अभिनव उपक्रम राबवून कोरोनाच्या संकटावर मात करतील अशी आशा बाळगूया.


Vaccine on #Corona | कोरोनावरील लस तयार केल्याचा केडिला हेल्थकेअरचा दावा, सध्या प्राण्यांवर चाचणी सुरु