Coronavirus India :  देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. देशभरात ओमायक्रॉनचा व्हेरियंट फैलावत असल्याची भीती आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी महाराष्ट्रात 11,877 बाधितांची नोंद करण्यात आली. शनिवारच्या तुलनेत ही बाधितांच्या संख्येत 29 टक्क्यांनी ही वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, कर्नाटकमध्ये बाधितांच्या संख्येत 241 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रविवारी कर्नाटकमध्ये 1187 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दिल्लीमध्ये 3194 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. 


महाराष्ट्रात काय स्थिती?


महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत  सातत्याने वाढ होत आहे. राज्यात रविवारी नऊ मृत्यूची नोंद झाली. सक्रिय असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 42,024 वर पोहोचली. तर, मुंबईची संख्या 29,819 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत 20 डिसेंबर (2,061) पासून तब्बल 1,300% वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत रविवारी 503 बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी 389आणि शुक्रवारी 497 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 503 कोरोनाबाधितांपैकी 56 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 


मुंबईत रविवारी 7,792 संसर्गबाधितांची नोंद झाली. शनिवारी ही संख्या 6,186 होती. शनिवारच्या तुलनेत रविवारी बाधितांच्या संख्येत 26 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, राज्यात 50 नवीन ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 510 इतकी झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक नवीन प्रकरण नोंदवण्यात आले आहे. पुण्यात 36 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आठ बाधितांची संख्या नोंदवण्यात आली. 


कर्नाटकमध्ये बाधितांची संख्या वाढतेय


कर्नाटकात रविवारी 1,187 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 10,292 आहे. त्यापैकी 8,671 एकट्या बेंगळुरू शहरी जिल्ह्यात आहेत. कर्नाटकात सहा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी तीन बेंगळुरू आणि दक्षिण कन्नड, तुमाकुरू आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद करण्यात आली. 


बेंगळुरू शहरी भागात रविवारी, 923 बाधित आणि तीन मृतांची नोंद करण्यात आली. त्याशिवाय, दक्षिण कन्नडमध्ये 63, उडिपीमध्ये 20 आणि मैसूरमध्ये 20 आणि बेळगावी, तुमाकुरू आणि कोडागूमध्ये 12 आणि 10 बाधित मंड्यामध्ये नोंदवण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर सरकारने कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 


दिल्लीत ओमायक्रॉनने चिंता वाढवली


जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात दिल्लीमध्ये ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या बाधितांपेक्षा अधिक संख्या नोंदवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये रविवारी 3194 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. एक जानेवारीपासून दिल्लीत 5910 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. 


गुजरातमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ


गुजरातमध्ये रविवारी 968 कोव्हिडबाधितांची नोंद करण्यात आली. गुजरातमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8,33,769 झाली आहे. तर, 10,120 कोव्हिडबाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी गुजरातमध्ये 1069 बाधितांची नोंद झाली. मागील सात महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. अहमदाबाद शहरात 396 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शनिवारी 23 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली.