नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहेत. दिल्लीमध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. अशातच ज्या व्यक्ती नियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करण्यात येणार आहे. देशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधातील आंदोलनांचं केंद्र बनलेलं शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. आज 101व्या दिवशी पोलिसांनी शाहीन बाग येथील तंबू हटवला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईला काही लोकांनी विरोध केला त्यामुळे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.


शाहीन बाग व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जामिया, सीलमपूर, जाफराबाद, तुर्कमान गेट, मालवीय नगर, हौज रानी येथूनही आंदोलकांना हटवलं आहे. दिल्लीमध्ये एकूण आठ ठिकाणांवरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे.


आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, सध्या शाहीन बाग खाली करण्याची कारवाई सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही आधी विनंती करत होतो. परंतु, आज सकाळी आम्ही कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत 10 ते 12 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


दरम्यान, दिल्लीतील शाहीन बाग येथे अनेक महिन्यांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू होत. काही आंदोलनकर्त्यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दिल्लीत लागू करण्यात आलेल्या कलम 144 पाळण्यास मनाई केली.


मोदी सरकारने याचवर्षी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडलं होतं. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या सहिनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं होतं. त्यानंतर देशभरातून या कायद्याला प्रचंड विरोध करण्यात आला होता.


आज रात्री मोदी देशातील जनतेशी संवाद साधणार


जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत. रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार मोदी


Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?


वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO