Coronavirus LIVE Updates : राज्यासह देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा एका क्लिकवर

India Coronavirus LIVE Updates: दिवसभरातील कोरोनाचे महत्त्वाचे अपडेट्स, राज्य आणि देशभरासह राज्यातील कोरोना नियमावली, निर्बंधासंबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 08 Jan 2022 12:23 PM
अभिनेत्री मिथिला पालकर कोरोनाची लागण

अभिनेत्री मिथिला पालकर कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. 'कारवां' फेम अभिनेत्री मिथिला पालकरने सांगितले की, तिच्या वाढदिवसापूर्वीच तिला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये असून स्वतःची काळजी घेत आहे.

सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद होणार : पालकमंत्री छगन भुजबळ

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. यानंतर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

आयआयटी मद्रासचे चिंता वाढवणारे भाकीत, पुढील महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित...

मागील काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ओमायक्रॉनमुळे असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच आता आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात 1 चे 15 फेब्रुवारी दरम्यान कोरोनाचा जोर वाढणार असून संसर्ग परमोच्च बिंदू गाठणार आहे. या आठवड्यात R-naught मूल्य 4 इतके झाले असल्याची माहिती डॉ. जयंत झा यांनी दिली. 

भाजप आमदार गिरीश महाजन कोरोनाबाधित

माजी मंत्री गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करण्याचे आव्हान केले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन

राजकीय नेतेसुद्धा कोरोनाबाधित होताना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी ट्वीट करत आपला अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आयसोलेशनमध्ये असून, आपल्या संपर्कातील आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन दानवे यांनी केले आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; राज्यात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी वाढली

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, त्याच्या परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पार्श्वभूमी

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 285 जणांचा मृत्यू


देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण देखील वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 41 हजार 986 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 285 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात 3 हजार 71 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आडेवारी जाहीर केली आहे.


देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 4 लाख 83 हजार 463 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 नागरिक कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही 4 लाख 72 हजार 169 झाली आहे. दरम्यान, देशात सध्या वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत देशात 150 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 90 लाख 59 हजार 360 लसींचे डोस देण्यात आले आहेत. एकूण लसींचे डोस हे 150 कोटी 61 लाख 92 हजार 903 डोस दिले आहे. देशातील 91 टक्क्यांहून अधिक प्रौध लोकसंख्येला किमान 1 डोस तरी देण्यात आला आहे. तर 66 टक्को लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर 15 ते 17 वयोगटातील 22 टक्के मुलांना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे. 


देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव


देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाचं ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशात आत्तापर्यंत 3 हजार 71 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 1 हजार 203 जण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत, तर या नवीन व्हेरिएंटमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यनिहाय विचार केला तर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून, त्यानंतर दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत.


ओमायक्रॉनची देशातील स्थिती


एकूण रुग्ण 3 हजार 71
ओमायक्रॉनमधून बरे झालेले - 1 हजार 203
एकूण 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव
मृत्यू - 2

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.