नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे मरगळ आलेल्या अर्थव्यवस्थेसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वैयक्तिक व्याजदरात मोठी कपात केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 75 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे रेपो रेट आता 5.15 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आला आहे. यासोबतच रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 बेसिस पॉईंटने कपात करुन 4 टक्के केला आहे. शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
"आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो. सामान्यांसोबतच उद्योगांवर कोरोनाचा प्रभाव पाहता सरकार कर्जाच्या ईएमआयवर दिलासा देण्याची तयारी करत आहे," असं शक्तिकांत दास म्हणाले.
ईएमआय तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला
यासोबत आरबीआयने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. हा आरबीआयचा आदेश नाही तर केवळ सल्ला आहे. याचाच अर्थ चेंडू आता बँकांच्या कोर्टात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ईएमआयवर सूट द्यायची की नाही हे आता बँकांनाच निश्चित करायचं आहे.
अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी मोठा काळ लागणार : शक्तिकांत दास
"कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्था 2 ते 3 वर्ष मागे गेली आहे. सगळं पूर्वपदावर आल्यानंतर ही अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी फार वेळ लागेल. या महामारीचा सामना करण्यासाठी सगळ्यांना एकजूट होऊन काम करणं गरजेचं आहे," असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं.