Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 8582 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची धोक्याचा अंदाज वर्तवला आहे.


देशात शनिवारी दिवसभरात 4 हजार 435 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. सध्या एकूण 44 हजार 513 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नवी माहिती जारी केली आहे. देशात आतापर्यंत पाच लाख 24 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित


गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2922 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 1392  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरातील असून मुंबईत 1745 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 




 


नाशिकमध्ये कोरोना हातपाय पसरतोय


नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत याबाबत सांगितलं आहे.


दिल्लीतही पसरतोय कोरोना


दिल्लीत गेल्या 24 तासांत 795 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण सकारात्मकतेचा दर 4.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.


चीनमध्ये कोरोनाची दहशत


कोरोना महामारीमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. याचे कारण राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. येथे कोविड-19 च्या वाढत्या परिस्थितीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने बीजिंगमधील कोरोना स्फोटाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.