मुंबई: चीनमधील कोरोना (China Corona) उद्रेकानंतर केंद्र सरकार खबरदारीची पाऊलं उचलंत आहे. चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व महत्वांच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. रुग्णालयांमधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.


 जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड संसर्ग (Corona virus Cases) वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. असं असताना भारतात देखील सतर्कता बाळगली जाऊ लागली आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज देशभरातील सर्व आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आला आहे. ऑक्सिजन उत्पादन यंत्रासह आरोग्याच्या सुविधांबाबत तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.


मॉकड्रिलकरता आरोग्य विभगाने सर्व जिल्ह्याच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मॉकड्रिलचे रिपोर्ट केंद्र सरकारकडे  देण्यास सांगितले आहे. जगभरातील कोरोनाचा उद्रेक पाहता प्रशासनाने ही तयारी केली आहे. थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटायजर आदींचा साठा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोरोनाचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. 


आरोग्य विभागाकडून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पूर्वी कोविड सेंटर होते तिथे गॅस प्लान्टपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर या सारख्या सुविधांची  व्यवस्था करणे, त्यानंतर त्याची माहिती केंद्र सरकारला द्या. जर कोरोनाची परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यास तर वैद्यकीय महविद्यालयात रुग्णालय सुरू करता येईल अशी व्यवस्था करा. 


चीन, जपान, अमेरिकासारख्या देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता आपल्या देशातही सर्व शासकीय रुग्णालयांना तयार राहण्याचे संकेत मिळालेले आहे सर्व शासकीय रुग्णालयांचा आढावा घेण्याचं सांगण्यात आलं आहे.  त्यानुसार आज संपूर्ण देशात रुग्णालयातील तयारीचा आढावा घेऊन मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. अत्यावस्थ कोविड रुग्ण रुग्णालयात आला तर कशाप्रकारे हाताळणी करायची, आवश्यक मनुष्यबळ , औषधे , ऑक्सिजन इत्यादी बाबी तयार आहेत किंवा नाही हे यावेळी तपासण्यात येणार आहे


राज्य, केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. आजच्या मॉकड्रिलसाठी देशाभरातीस रुग्णालये सज्ज झाली आहेत.