नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या अनलॉक-3 च्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनबाहेर असणारे निर्बंध अजून शिथील करत आले असून अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. नव्या गाईडलाईननुसार, नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रात्री फिरण्यावरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.
देशात 25 मार्चपासून बंद असलेल्या योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना 5 ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नव्या गाईडलाईननुसार कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी मेट्रो सेवा, थिएटर, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार सुरु केले जाऊ शकतात. मात्र या सेवा सुरु करण्याच्या तारखा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच जाहीर केल्या जातील.
वंदे बारत मोहिमेअंतर्गत मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. इतर आंतरराष्ट्रीय उड्डाणं टप्प्याटप्याने सुरु केले जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत स्वातंत्र्यदिनच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना मास्क घालणे आणि इतर नियमांचं पालन करणे बंधनकारक असणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ठ्ये
- व्यक्तींच्या रात्रीच्या ये- जा करण्यावरचा निर्बंध (नाईट कर्फ्यु) रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली.
- योग संस्था आणि जिम्नॅशियम 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यासाठी परवानगी. या संदर्भात, शारीरिक अंतर राखण्यासाठी आणि कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मानक संचालन पद्धती जारी करेल.
- स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर यासह इतर आरोग्य नियमांचे पालन करत परवानगी.या संदर्भात गृह मंत्रालयाने 21-7- 2020 रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन आवश्यक.
- राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर, शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- प्रवाश्यांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला वंदे भारत अभियानांतर्गत मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे.
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, तरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियाम, सभागृह आणि तत्सम स्थळे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आणणारे कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार या बाबी खुल्या होण्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे ठरवण्यात येतील.
- प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी जारी राहील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन, कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राचे काळजीपूर्वक सीमांकन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक परिघिय नियंत्रण राखणे आवश्यक असून केवळ आवश्यक बाबीनाच परवानगी राहील.