नवी दिल्ली : लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही, ते फक्त पॉझ बटण आहे. कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे टेस्टिंग आणि टेस्टिंग क्षमता वाढवायला हवी, असा सल्ला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दिला. देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


कोरोनाशी लढण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक सल्ले दिले. ते म्हणाले की, "कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्था आणि वैद्यकीय या दोन स्तरावर काम करावं लागेल."


लॉकडाऊन म्हणजे पॉझ बटण, उपाय नाही
राहुल गांधी म्हणाले की, "देशात सध्या कोरोनाचं खूप मोठं संकट आहे. लॉकडाऊन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरील उपाय नाही. लॉकडाऊन केवळ पॉझ बटण आहे. लॉकडाऊन उठताच कोरोनाबाधितांची संख्या वाढले. अशा परिस्थितीत आपल्याला कोरोना रोखण्यासाठी रणनीती तयार करुन काम करायला हवं. टेस्टिंग वाढवायला हवी आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही वाढवायला हव्या, जेणेकरुन कोरोनाशी लढता येईल. आपली टेस्टिंग क्षमता अतिशय कमी आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी 350 चाचण्या होत आहेत. टेस्टिंगची क्षमता वाढवावी, असा माझा सल्ला आहे." तसंच देशात टेस्टिंग किटची मोठी कमतरता असल्याचं राहुल गांधी म्हणाले.


"कोरोनामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी द्यावा, त्यांना जीएसटी परतावा द्यावा," अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.


बेरोजगारीवर उपाय शोधायला हवा
मोदी सरकारला सल्ला देताना राहुल गांधी म्हणाले की, "आपल्याला अर्थव्यवस्थेच्या स्तरावर तयार राहायला हवं. गरिबांसमोर धान्याचं संकट येणार आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर उपाय शोधायला हवा. यासाठी सूक्ष्म-लघु उद्योगांसाठी पॅकेजची व्यवस्था करायला हवी. सोबतच मोठ्या कंपन्याना मदत करायली हवी."


गरिबांना प्रत्येक आठवड्यात धान्य द्या
ज्या लोकांना पैशांची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचत नाही. धान्याचं संकट आहे. अनेक लोकांकडे रेशन कार्ड नसल्याने, त्यांना त्याशिवायच धान्य द्यायला हवं. गरिबांना प्रत्येक आठवड्यात 10 किलो तांदूळ किंवा गहू , एक किलो साखर आणि डाळ द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.