जम्मू : यंदा अमरनाथ यात्रा होणार की नाही याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे. बुधवारी यासंदर्भात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. कोरोनाचा प्रसार देशामध्ये वेगाने होत आहे. यामुळे यावर्षीची ऐतिहासिक अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात अमरनाथ बोर्डाची जम्मूत बैठक झाली होती. या बैठकीत यात्रा रद्द करण्याबाबत उप राज्यपाल गिरीषचंद्र मुर्मू यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या माहिती संचालनालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.


23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाने याबाबत काढलेलं पत्रक मागे घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अखेर राजभवनच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 23 जूनपासून ही यात्रा सुरू होणार होती. पण कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.

यावर्षीच्या अमरनाथ यात्रेबाबतच्या स्थितीबाबत स्पष्ट करताना रात्री 8.44 वाजता दिलेल्या प्रेसनोटमध्ये राजभवन जम्मू यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की, आजची स्थिती पाहून अमरनाथ यात्रा करणं शक्य नाही. सध्या कोरोना महामारीचा वेग जास्त आहे. येत्या काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन अमरनाथ यात्रा आयोजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

त्याआधी 7:06 मिनिटांनी आलेल्या प्रेसनोटमध्ये अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि अमरनाथ देवस्थान मंडळचे अध्यक्ष गिरीश चंद्र मुर्मू यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरनाथ यात्रा काश्मीर खोऱ्यातून ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर करोनाचे 77 रेड झोन आहेत. यामुळे लंगर उभारणं, वैद्यकीय सुविधा, छावण्या, सामानाची वाहतूक आणि रस्त्यावर पडलेला बर्फ हटवणं शक्य होणार नाही. म्हणून यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करावी, असा निर्णय झाला होता.

नायब राज्यपाल मुर्मू म्हटलं आहे की, सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. पण कोरोनामुळे देशातील व्यवहार कधीपर्यंत बंद राहतील हे अद्याप स्पष्ट नाही. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा सरकार आणि प्रशासनाकडून प्राधान्याने विचार करण्यात येतोय, असं त्यांनी सांगितलं. श्री अमरनाथ श्राइन बोर्ड यंदा प्रथम पूजा आणि संपन्न पूजा या कार्यक्रमासह पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्याबाबत विचार करत आहे, अशीही माहिती आहे.