नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येतंय. अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची कामं बाजूला ठेवावीत आणि लोकांना मदत करावी अशी सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशातील व्यवस्था फेल गेल्याचीही टीका त्यांनी केली आहे. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की,  "व्यवस्था फेल गेली आहे त्यामुळे जनहिताची गोष्ट करणे आवश्यक आहे. देश संकटात असताना जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की सर्व राजकीय कामे बंद करावी आणि फक्त लोकांची मदत करावी. शक्य त्या प्रकारे लोकांचे दु:ख दूर करावे." 


 






देशातील परिस्थिती चिंताजनक
देशात कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3,49,691 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे  2,767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,17,113 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी देशात 3,46,786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. 


दरम्यान, चार दिवसांत देशात 13 लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 21 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत क्रमश: 3.14 लाख, 3.32 लाख, 3.46 लाख, 3.49 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 


महत्वाच्या बातम्या :