नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 6 हजार 654 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 720 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 51 हजार 784 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.98 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 66 हजार 330 आहेत.


देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल 2345 कोरोनाबाधितांची वाढ झाली. दिलासादायक म्हणजे 1408 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजार 642 झाला आहे. त्यातील 11 हजार 726 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 28.15 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 454 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत 25 हजार 500 कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील 882 जणांचा बळी गेले आहेत.