नवी दिल्ली : लॉकडाऊन संपायला आता एक आठवडा उरला आहे. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर केंद्र स्तरावर मंथन सुरु आहे. केवळ राज्यं सरकारच नव्हे, तर काही तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवण्याची गरज बोलून दाखवली आहे.


तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राजस्थानचे अशोक गहलोत, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार करु शकते. सध्या देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या आसपास पोहचली आहे. अजूनही इतर देशांच्या तुलनेत मोठा उद्रेक झालेला नाही, मात्र संख्या अजून स्थिर होताना दिसत नाही. त्यामुळे ज्यावेळी वेग मंदावेल त्याचवेळी मोठा दिलासा मिळेल.


लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कसा हटवता येईल याबाबत तज्ज्ञांची मतं घेतली जात आहेत. कारण जरी काही ठराविक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी ट्रेन, विमान सेवा चालू करताना त्याबाबत व्यवस्थित विचार करावा लागणार आहे. 12 किंवा 13 एप्रिलला केंद्र सरकारची अजून एक बैठक होणार आहे, त्यात याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो. शिवाय लॉक डाऊनबाबत राज्यं सरकारांनाही अधिकार आहेत. त्यामुळे काही राज्य सरकारं स्वत:च्या कार्यक्षेत्रातही निर्णय घेऊ शकतात.


लॉकडाऊन 15 एप्रिलनंतर शिथील होईल असं गृहीत धरु नका : राजेश टोपे


राज्याचा विचार केला तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे संकेत दिले होते. लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.


Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?