Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. अशातच जगाची धास्ती वाढवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतातही शिरकाव झाला आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आहेत. अशातच देशात काल (रविवार) दिवसभरात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या सध्याची कोरोनाची स्थिती... 


आतापर्यंत 4 लाख 73 हजार 537 मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 98 हजार 416 आहे. तसेच या महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 73 हजार 537 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (रविवारी) 8834 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 वर पोहोचली आहे. 


आतापर्यंत 127 कोटी लसीचे डोस 


राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 127 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (रविवारी) 24 लाख 55 हजार 911 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीचे 127 कोटी 93 लाख 9 हजार 669 डोस देण्यात आले आहेत. 







5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन


जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धाकधुक वाढवली आहे. अशातच आता या व्हेरियंटनं भारतातही प्रवेश केला आहे. जगभरातील एकूण 38 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही आता ओमायक्रॉन आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केवळ चारच दिवसात भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 6 डिसेंबरपर्यंत या व्हेरियंटची संख्या 21 वर पोहोचली आहे. 


रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट राजधानी दिल्लीसह 5 राज्यात फैलावला आहे. अशातच देशातील एकूण ओमायक्रॉनची संख्या 21 वर पोहोचली आहे. सर्वाधिक 9 रुग्ण राजस्थानमध्ये आहे, तर 8 रुग्ण महाराष्ट्रात, 2 रुग्ण कर्नाटकात, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आहे.  


महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 वर


शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.


ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक नाही, सिंगापूर आरोग्य मंत्रालयाची माहिती 


जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटव्हेरियंटव्हेरियंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरियंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये, पाहण्यासाठी क्लिक करा