Coronavirus News Cases : देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात मागील 24 तासांत 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 551 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय गुरुवारी दिवसभरात  53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात 19 हजार 893 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत  दिलासादायक बाब अशी की, कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 


कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक


देशात मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी दिवसभरात 21 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात एकूण 4 कोटी 34 लाख 45 हजार 624 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असणे ही दिलासादायक बाब आहे. सध्या देशात 1 लाख 35 हजार 364 सक्रिय कोरोनो रुग्ण आहेत. 


महाराष्ट्रात 1862 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात 1862 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गुरुवारी दिवसभरात एकूण 2019 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. राज्यात गुरुवारी सात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,93,764 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


मुंबईत गुरुवारी 410 रुग्णांची नोंद


मुंबईत गुरुवारी 410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात एकूण 12077 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3386   इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2235 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी  279 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,04,261 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.