Coronavirus Cases Today in India : देशात एकीकडे सणासुदीचं वातावरण आहे. दोन वर्ष कोरोना निर्बंधांमुळे सण साजरे करता येत नव्हते. मात्र यंदा कोरोनाचे नियम हटल्याने सर्व सण साजरे करता येत आहेत. तर दुसरीकडे देशातील कोरोना संसर्गामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 6 हजार 395 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. याच्या आदल्या दिवशी (मंगळवारी) 5,379 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 1,016 रुग्णांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचं कारण आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात सहा हजार हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  


सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांवर


गेल्या 24 तासांत देशात 6 हजार 614 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. दिवसभरात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्यी देखील कमी झाली आहे. सध्या देशात 50 हजार 342 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यामधील बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणं असलेले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.7 टक्के आहे.






महाराष्ट्रात कोरोनाचा आलेख घसरतोय


आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 1747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 एवढे झाले आहे. राज्यात आज पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 79,52,049 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 7043 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण


मुंबईत बुधवारी दिवसभरात 316 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,25,109 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,714 झाली आहे. सध्या मुंबईत 2,218 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.