Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्या आधीच्या दिवशी 6 हजार 422 कोरोना रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्येमध्ये 123 रुग्णांची घट झाली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.
देशात 46 हजार 148 सक्रिय रुग्ण
भारतात गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवभरात 5 हजार 916 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. गुरुवारी दिवसभरात 23 रुग्णांच्या मृत्यूसह एकूण कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 28 हजार 273 इतका झाला आहे. सध्या देशात 46 हजार 148 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर म्हणजे पॉझिटीव्हिटी रेट 1.89 टक्के आहेत. तर आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट 1.70 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार 964 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत पुन्हा वाढ
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी गेल्या आठवड्यात कमी झालेल्या संख्येत आता पुन्हा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात 881 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. परंतु, त्याआधी म्हणजे सोमवारी राज्यात फक्त 414 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रूग्ण संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची आज संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 1,165 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 79,60,298 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्केएवढे झाले आहे.