Coronavirus Cases Today in India : देशात एकीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. त्याआधी शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेत 410 रुग्णांची घट झाली आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाचा विळखा कमी झाल्यानं देशात यंदा गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे.

Continues below advertisement


सक्रिय रुग्णांची संख्या 55 हजार 114 इतकी


देशात गेल्या 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली आहे. सध्या देशात 55 हजार 114 कोरोनाबाधित उपचाराधीन आहेत. तर शनिवारी दिवसभरात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.12 टक्के इतकं घसरलं आहे. त्याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 98.69 टक्के झालं आहे. 


213 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले


आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 38 लाख 73 हजार 430 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तर शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 19 लाख 35 हजार 814 डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 213 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत.






महाराष्ट्रात 1272 नवे कोरोनाबाधित


राज्यात गेल्या 24 तासांत 1272 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शनिवारी दिवसभरात एकूण 1771 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 1771 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 78,46,694 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.06 % एवढे झाले आहे. राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 


मुंबईत शनिवारी 394 रुग्णांची नोंद


कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात कमी होताना दिसत आहे. आज मुंबईत 394 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र दिसत आहे. 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 623 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,23,001 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,707 झाली आहे. सध्या मुंबईत 3,183 रुग्ण आहेत.