Coronavirus Cases Today in India : कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 9923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात सध्या 79 हजार 313 रुग्ण कोरोना विषाणूंच्या संसर्गावर उपचार घेत आहेत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट एक दिलासादायक बातमी आहे. सोमवारी दिवसभरात 7 हजार 293 कोरोनाबाधितांनी संसर्गावर मात केली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालायने नवीन आकडेवारी जारी करत देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. भारतात एकूण 5 लाख 24 हजार 890 रुग्णांचाय कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेनं आज समोर आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येतं.






देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 196.18 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या आकडेवारीनं 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांचा टप्पा ओलांडला होता. कोरोनाबाधितांची संख्या 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला 1 कोटींवर पोहोचली होती.