नवी दिल्ली : कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांचा सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणात 7.75 लाख लोकांपैकी 97 टक्के लोकांनी लसीकरण प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, को-विन या मोबाइल अ‍ॅपद्वारे 17 जानेवारीपासून लसीकरण झालेल्या नागरिकांची प्रतिक्रिया सरकार घेत आहे. 7.75 लाख लोकांना अभिप्राय मिळाला आहे. कोविड 19 विरूद्ध देशभरात लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली.


राजेश भूषण यांनी म्हटलं की, 17 जानेवारी रोजी आम्हाला लसीकरण झालेल्या लोकांकडून (अॅपचा वापर करणारे) क्विक असेसमेंट सिस्टमच्या (आरएएस) माध्यमातून को-विन अ‍ॅपवर अभिप्राय मिळू लागले आहेत. लसीकरणाच्या संपूर्ण अनुभवाने 97 टक्के लोक समाधानी आहेत. 7.75. लाख लोकांच्या अभिप्रायावर ही टक्केवारी आधारित आहे.


सर्वेक्षणातील 88.76 टक्के लोकांनी असे म्हटलं आहे की, त्यांना लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती होती, तर 97.19 टक्के लोक म्हणाले की लसीकरणानंतर त्यांना 30 मिनिटे थांबवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं.


कोरोना लसीकरणाची सद्यस्थिती


लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 65,28,210 झाली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या 1,34,616 सत्रांचे आयोजन करण्यात आले. कालच्या दिवसात संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत 7860 सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 2,69,602 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यामध्ये 1,02,941 आरोग्य कर्मचारी आणि 1,66,261 आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. लसीकरण झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये 55,85,043 आरोग्य कर्मचारी आणि 9,43,167 आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती


गेल्या 24 तासांत देशभरात 9,110 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना अॅक्टिव रुग्णसंख्येतही सतत घट होत आहे. भारतात अॅक्टिव रुग्णांची एकूण संख्या आज घसरून 1.43 लाख (1,43,625) झाली आहे. आतापर्यंत एकूण 1.05 कोटी (1,05,48,521) रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14,016 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेले रुग्ण आणि अॅक्टिव रुग्ण यातील तफावत उत्तरोत्तर वाढतच आहे. आज ही तफावत 1,04,04,896 इतकी आहे.