नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लस सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. दररोज देशातील लाखो लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 21.58 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या देशात भारत बायोटेकची लस कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची लस कोविशिल्ड, तर रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला सरकारने मंजुरी दिली आहे.
नागरिकांना या सर्व लसींचे दोन डोस दोन टप्प्यात दिले जात आहेत. कोरोनाच्या या लसींच्या दोन डोसमधील अंतराबाबत सरकारने विशिष्ट कालावधी ठरवून दिला आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर 12-16 आठवडे तर कोवॅक्सिनच्या दोन डोसमध्ये 4-6 आठवडे अंतर आणि स्पुटनिक व्ही लसीच्या दोन डोसमध्ये 21 ते 90 दिवसांचं अंतर सरकारने सांगितलं आहे.
कोरोना लसींचा प्रभाव नागरिकांवर किती दिवस राहणार आहे, हा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. म्हणजे एकदा लसीचे दोन डोस घेतले की कोरोनापासून आपण किती दिवस सुरक्षित राहणार आहोत.
लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी किती वेळ लागेल?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) डॉ. कॅथरीन ओ ब्रायन यांच्या मते, प्रथम डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास सुरुवात होते. परंतु दुसरा डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती आणखी वाढते.
लसीमुळे तयार झालेली रोग प्रतिकारकशक्ती किती काळ टिकेल?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती किती काळ राहील हे अद्याप समजू शकलेले नाही. डॉ. कॅथरीन यांच्या म्हणण्यानुसार, आम्हाला अद्याप माहिती नाही की लसीपासून बनवलेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते. त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. ते म्हणाले की, लस घेतलेल्या लोकांचं आम्ही निरीक्षण करत आहोत. त्यानुसार लोकांमध्ये प्रतिकारशक्ती टिकून राहत आहे आणि यामुळे ते कोरोनापासून सुरक्षित राहत आहेत. म्हणून आपल्याला काही काळ थांबावे लागेल, जेणेकरुन आम्हाला कळेल की लसीमुळे लोक किती दिवस सुरक्षइत राहू शकतील.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फायझर लसीच्या दोन डोसांनंतर या लसीचा परिणाम सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ राहतो. त्याचप्रमाणे मॉडर्ना लसीचे दोन घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती सहा महिने राहते. भारतात जी कोविशिल्ड लस दिली जात आहे, याचा परिणाम एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो असा अंदाज आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती कमी होते?
भारतासह जगभरात कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार लस B.1.617.1 आणि B.1.617.2 या दोन्ही प्रकारांविरूद्ध प्रभावी आहे. शास्त्रज्ञांच्या मते, लसीच्या दोन डोसांनंतर, एक बूस्टर डोस देखील आवश्यक असेल.
कोवॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकनेही बूस्टर डोस चाचण्या सुरू केल्या आहेत. बूस्टर डोस चाचणीत भाग घेणाऱ्यांना दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी दिला जातो. या सर्वांना गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या लसीचा दुसरा डोस देण्यात आला होता.