नवी दिल्ली : देशातील लसीकरणाने आज 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानलं आहे. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 


देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल."


 






दरम्यान, कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा आज ओलांडला आहे. देशात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.


देशातील लसीकरणाचे टप्पे कसे पार पडले?


16 जानेवारी 2021- लसीकरण सुरु
1 फेब्रुवारी 2021-  1 कोटी डोस  
15 जून 2021 - 25 कोटी डोस
6 ऑगस्ट 2021 - 50 कोटी डोस
1 सप्टेंबर 2021- 75 कोटी डोस
21 ऑक्टोबर - 100 कोटी डोस


देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच करण्यात आलं आहे. भारताने आज जो शंभर कोटी लसींचा टप्पा पार केलाय, त्यासाठी ठीक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे. या महत्त्वपूर्ण दिवसाबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात अनाउन्समेंट केली जात आहे. या अनाउंसमेंटमधून आजच्या दिवसाची माहिती दिली जातेय. सोबतच ज्या ज्या कर्मचाऱ्यांमुळे केवळ नऊ महिन्यात हे लक्ष गाठता आलं त्या सर्वांचे आभार देखील मानले जात आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये सध्या अनाउन्समेंट सुरू आहे.


संबंधित बातम्या :