मुंबई: कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवार एक मार्चपासून सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी सुरु झालेल्या या लसीकरणासाठी नोंदणी कुठे करायची आणि आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोरोना लस कुठे मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्या बद्दलच्या शंकांचे समाधान खालील माहितीतून होऊ शकेल.


या टप्प्यात कोणाला लस मिळणार?
ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. ज्या लोकांना हृदय, कॅन्सर, किडनी संबंधी आजार, डायबेटिस, हायपरटेन्शन असे गंभीर असे आजार आहेत आणि त्यांचे वय हे 45 वर्षावर आहे, त्यांनाही या टप्प्यात लस मिळणार आहे.


लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंद करायची?
कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in या पोर्टलवर नोंद करणं गरजेचं आहे.


कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?




  •  http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

  • इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं "Get OTP" या बटणावर क्लिक करा.

  • एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.

  • ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन "Verify" या बटणावर क्लिक करा.

  • ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही "registration of Vaccination" अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.

  • सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर "Register" या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा "Schedule Appointment" वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं "Book Appointment for Vaccination page" असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.


Sharad Pawar | शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली, मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी मात्र पाळला!


इतर माध्यमातून नोंद करता येते का?
होय, आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते.


कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
ज्यांचे वय हे 45 वर्षावर आहे आणि त्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांना लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी आपल्याला गंभीर आजार असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे. या लोकांना तसेच ज्यांचे वय 60 वर्षावर आहे त्यांना आधार कार्ड, व्होटिंग आयडी नंबर अथवा अधिकृत फोटो आयडी नंबर द्यावा लागणार आहे.


लसीकरणासाठी आपण ठिकाण निवडू शकतो का?
होय, लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.


Covid-19 Vaccination: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी, खासदार शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी घेतली लस