Covid Vaccination : देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे.  सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे.  देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचे सूत्रांकडून कळले आहे. 






आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


CoWIN पोर्टल अपग्रेड, आजपासून दररोज 1 कोटी नोंदणी होणार


कोविड 19 लस नोंदणीसाठी आता को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. आता दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.


राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच 


कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 24,00,727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच काल  कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. काल दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.