नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. तज्ज्ञांनी लसीचे वर्णन कोरोनाविरूद्धच्या लढाईतील संरक्षक ढाल म्हणून केले आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी म्हणून एक मोठी मोहीम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीपासूनच काही अफवा सतत पसरत असल्या तरी दरम्यान, सोशल मीडियावर एक नवीन दावा व्हायरल होत आहे. या दाव्यात असे म्हटले जाते की सरकार लसीच्या बहाण्याने लोकांच्या शरीरात मायक्रोचिप ट्रान्सप्लांट करत आहे. अशा दाव्यांशी संबंधित बरेच व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि मेसेजबाबत सत्य काय आहे जाणून घेऊयात?
सोशल मीडियावरील दावा
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार कोरोना लसीच्या बहाण्याने लोकांच्या शरीरावर मायक्रोचिप ट्रान्सप्लांट करत आहे, जेणेकरून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येईल.
मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओज आणि मेसेजेसमध्ये तथ्य नाही. लसीकरणाबाबत या निव्वळ अफवा पसरवल्या जात आहेत. तसेच सरकारने पासपोर्टसाठी लसीकरण अनिवार्य केले असल्याची कोणतीही बातमी नाही. अशा परिस्थितीत तपासणीनंतर सोशल मीडियावर केलेला हा दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर अशी अफवा पसरल्या गेल्या होत्या की बिल गेट्स लोकांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्यासाठी लसीकरणाचा वापर करत आहेत. तपासणीनंतर हा दावाही खोटा असल्याचे दिसून आले.
देशातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम केवळ तीव्रच केली नाही तर कोविन पोर्टलवर अनिवार्य नोंदणीही दूर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घ्यावेत जेणेकरुन कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकले जाऊ शकेल.
लसीकरणात भारताने अमेरिकेलाही मागे टाकलं
कालच्या (28 जून) आकडेवारीनुसार, कोरोना लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने 32.36 कोटींचा टप्पा पार केला. काल सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 17,21,268 लसी देण्यात आल्या. कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.