नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण सातत्यानं वाढतच चाललं आहे. कोरोनाची दुसरी लाट देशापुढं मोठं आव्हान उभं करत आहे. अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनापासून आरोग्य विभागापर्यंत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या यंत्रणांवरचा ताणही वाढत आहे. अनेक भागांमध्ये आवश्यक सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातील हे चित्र पाहता अनेक मित्र राष्ट्रांनी देशाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय काही धनाढ्य व्यक्तीही आता भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारताला मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सत्या नडेला यांनी ट्विट करत म्हटलं, 'भारतातील सद्य स्थिती पाहून फार दु:खी आहे. अमेरिकेच्या सरकानं मदतीसाठी पुढाकार घेतल्याचा मला आनंद आहे', मायक्रोसॉफ्ट सर्व प्रकारच्या मदतीसाठी हातभार लावणार असल्याचं सांगत क्रिटिकल ऑक्सिजन कंसन्ट्रेशन डिवाइस खरेदी करण्यासाठीही आधार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर, सुंदर पिचई यांनी भारतातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत 135 कोटी रुपयांची मदत केल्याचं जाहीर केलं. युनिसेफच्या माध्यमातून हा निधी वैद्यकिय संसाधनांचा पुरवठा आणि उतर सर्व मदतीसाठी केला जाणार आहे.
भारताला संकटकाळात मदत करणार अमेरिका
भारताचे NSA अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरताना दिसत आहे. कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने केली तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिलं.