West Bengal Elections देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आलेली असतानाच पश्चिम बंगालमध्ये मात्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आज (सोमवारी) येथे सातव्या टप्प्यासाठीच्या मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या सत्रात 34 जागांसाठी मतदान होत आहे. या 34 मतदार संघांमध्ये एकूण 86,78,221 मतदार असून, त्यांच्या हाती 284 उमेदवारांचं भवितव्य आहे. 


सातव्या टप्प्यासाठीच्या मतदार यादीमध्ये 44,44,634  पुरुष, 42,33,358  महिला आणि 229 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या टप्प्यात खालील जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 


मालदा (भाग एक)
कोलकाता दक्षिण
मुर्शिदाबाद (भाग एक)
पश्चिम वर्द्धमान (भाग एक)
आणि दक्षिण दिनाजपूर


सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6.30 वाजता संपणार 


मुर्शिदाबाद आणि पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील प्रत्येकी 9, दक्षिण दिजनापूर आणि मालदा येथील प्रत्येकी 6 आणि कोलकाता दक्षिण येथील चार विधानसभा क्षेत्रांमध्ये 12,068  मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरु असेल. यासाठी सुरक्षा दलाच्या 796 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. समसेरगंज आणि जंगीपूर येथील दोन उमेदवारांच्या निधनानंतर या दोन्ही जागांसाठीची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. या दोन्ही जागांसाठी 16 मे ही मतदानाची तारीख निर्धारित करण्यात आली आहे. 


Corona Vaccination | 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू


निवडणूक, मतदानाच्या या सत्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूरमधील जागांवर साऱ्यांच्याच नजरा असतील. ममता बॅनर्जी यावेळी नंदीग्राममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण, त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणाऱ्या सोवनदेब चट्टोपाध्याय यांना या मतदार संघातून तिकीट दिलं होतं. तर, भाजपनं अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या रुद्रनील घोष यांना या मतदार संघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. तेव्हा आता या जागेवर बाजी कोण मारणार हा कुतूहलाचाच विषय ठरत आहे.